
'चक दे इंडिया' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सागरिका घाटगेनं 2017 मध्ये क्रिकेटर झहीर खानशी लग्न केलं. लग्नानंतर सागरिका चित्रपटांपासून दूर गेली तरी सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात असते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करते.

सागरिकाने झहीरशी लग्न केलं तरी दोघं मिळून ईद, दिवाळी, गुढीपाडवा यांसारखे सण-उत्सव एकत्र साजरे करताना दिसतात. त्याचे फोटोही ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करते. याविषयी सागरिका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली.

सागरिका म्हणाली, "ही गोष्ट आम्हा दोघांसाठी खूप संवेदनशील आणि खासगी आहे. ही गोष्ट आमच्या दोघांच्या आयुष्याचा भाग आहे. एक व्यक्ती म्हणून आम्हा दोघांसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आम्हा दोघांसाठी धर्म हा रोजच्या आयुष्यातील भाग आहे."

"यात असं काहीच वेगळं नाही, ज्यावर मला प्रतिक्रिया दिली पाहिजे. आम्ही दोघं एकमेकांसोबत खुश आहोत. यापेक्षा आणखी काय महत्त्वाचं असू शकतं. धर्माचं त्याच्याशी काहीच घेणदेणं नाही", असं ती पुढे म्हणाली.

सागरिका आणि झहीरची ओळख ही अभिनेता अंगद बेदीच्या एका पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. लग्नाच्या वेळीही दोन्ही कुटुंबीयांनी साथ दिल्याचं सागरिकाने या मुलाखतीत सांगितलं.