
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प समजला जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धीमहामार्ग अंतिम टप्प्याचे लोकार्पण आज होणार आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणाऱ्या इगतपुरी ते आमणे असा हा 76 किलोमीटरचा महामार्ग आज प्रवाशांच्या सेवेत खुला केला जाणार आहे. मुंबई ते नागपूर हा प्रवास आता ८ तासात पुर्ण होईल.

समृद्धी महामार्गावर एकूण ११ बोगदे असून, त्यात ५ दुहेरी बोगदे आहेत. त्यांची एकूण लांबी २१.४६ किलोमीटर आहे.

या ७६ किलोमीटर टप्प्यात देशातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्यात आला आहे. याची एकत्रित लांबी ११ किलोमीटर आहे. त्यात इगतपुरी येथे सुमारे ८ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गावरील सर्वात लांब आणि रुंद बोगदा तयार करण्यात आला आहे.

या मार्गावर ३२ मोठे पूल आहेत. त्यात व्हायाडक्ट आणि ८४ मीटर उंचीवर असलेले पूल यांचा समावेश आहे. वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक उंचीच्या खांबांवर असलेला पूल आणि एकूण ३२ मोठे पूल, २५ इंटरचेंज आणि ६ कि.मी. ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत.

राज्यातील 5 महसूल विभागांच्या 10 जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधून हा 6 पदरी महामार्ग जातो आहे. त्यामुळे 10 जिल्हे प्रत्यक्ष आणि 14 जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडले जाणार आहेत

या महामार्गावर इगतपुरी, कसारा येथे असलेल्या बोगद्यांवर आदिवासी समाजाची संस्कृती दाखवणारे आकर्षक वारली चित्र रेखटण्यात आलेले आहेत. आदिवासी समाजाची जीवनशैली, शेती व्यवसाय, विपश्यना, पर्यटन अशा वेगवेगळ्या थीमच्या कलाकृती समृद्धी महामार्गावरील बोगद्यांवर रेखटण्यात आलेल्या आहेत.