
गुजरातच्या भूमीने देशाला अंबानी आणि अदानीं यांच्यासारखे दिग्गज उद्योगपती दिले, पण याच मातीत असा एक हिरा चमकला ज्याची यशोगाथा कोणत्याही चित्रपटाला मागे टाकेल. ते नाव म्हणजे सावजी ढोलकिया. सावजी ढोलकिया हे आज १६,००० कोटी रुपयांच्या साम्राज्याचे मालक आहेत. ढोलकिया यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अवघ्या १८० रुपये दर महिन्याच्या पगारावर केली होती.

सावजी ढोलकिया यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना केवळ पाचवीपर्यंतच शिक्षण घेता आले. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी शाळा सोडली. १९७७ मध्ये रोजगाराच्या शोधात ते सुरतला आले.

जेव्हा ते पहिल्यांदा सुरतमध्ये आले, तेव्हा त्यांच्या खिशात फक्त १२ रुपये होते, असे म्हटले जाते. सुरतमध्ये त्यांनी एका हिऱ्याच्या कारखान्यात काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा पहिला पगार फक्त १७९ रुपये इतका होता. मात्र त्यांची जिद्द इतकी मोठी होती की त्या अल्प पगारातूनही ते दरमहा ३९ रुपयांची बचत करायचे.

हिरे घासण्याचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर, त्यांनी या व्यवसायात उतरण्याचा धाडसी निर्णय घेतला. १९८४ मध्ये सावजी ढोलकिया यांनी आपले भाऊ हिम्मत आणि तुलसी ढोलकिया यांच्यासोबत मिळून व्यवसायाचा पाया रचला.

१९९२ मध्ये त्यांनी हरी कृष्णा एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अधिकृतपणे स्थापन केली. आज ही कंपनी जगातील ७९ देशांमध्ये पॉलिश केलेले हिरे निर्यात करते. १६,००० कोटींची उलाढाल असलेली ही कंपनी हिरे उद्योगातील एक जागतिक नाव असलेली कंपनी बनली आहे.

सावजी ढोलकिया केवळ त्यांच्या संपत्तीसाठीच नाही, तर त्यांच्या उदारतेसाठी जगभर ओळखले जातात. दिवाळी बोनस म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांना कार, घरे आणि मुदत ठेवी (FD) भेट देण्याची त्यांची परंपरा आहे. कर्मचाऱ्यांप्रती असलेल्या या संवेदनशीलतेमुळेच त्यांना एक आदर्श उद्योजक मानले जाते.