
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्य अंकिता हर्षवर्धन पाटील यांचा मोठ्या शाही थाटात आज मुंबईमध्ये ‘ताज’ हॉटेलमध्ये विवाह संपन्न झाला.

बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी वकिली व्यवसायात आपला जम बसवला आहे.

अंकिता पाटील आणि निहार ठाकरे आज मुंबई येथे ‘ताज’ हॉटेलमध्ये विवाहबद्ध झाले असून राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वधूवरांना शुभ-आशीर्वाद दिले आहेत.

अंकिता पाटील या विद्यमान पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आणि एक वर्ष लंडन येथील हायवार्ड मध्ये शिक्षण घेतले आहे.

पाटील घराण्याची लेक आता ठाकरे घराण्याची सून झाली आहे, त्यामुळे ठाकरे आणि पाटील घराण्याचे नवीन ऋणानुबंध तयार झाले आहेत.

या शाही विवाहसोहळ्याला राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आशीर्वाद दिले आहेत.