
राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज, मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान होत असून मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच आजचा हा मतदानाचा हक्क कोणाही हातचा न जाऊ देण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्यांची लग्न होती ते नवरदेव-नवरीपासून अनेकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. तर एक नवरदेव तर थेट घोड्यावरून मतदान करायला आला होता. यावरून मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे याची कल्पना सर्वांना असल्याचं लक्षात येते

मनमाडमध्ये उमेदवार असलेल्या तरुणाचं आज लग्न आणि मतदान दोन्ही असल्यामुळे त्याची धावपळ झाली होती, मात्र त्याने दोन्ही गोष्टींचा मेळ बसवत मतदानाचा हक्क बजावला आहे. या तरूणाचे नाव रोहन असून त्याची शिवसेने कडून उमेदवारी आहे.

नोकरीसाठी अमेरिकेत गेलेला तरूणाने भारतात येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अमेय सोमवंशी असं या तरूणाचं नाव असून गेल्या आठ वर्षांपासून तो अमेरिकेतील कॅलिफोर्नियात वास्तव्याला आहे. बदलापूर नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे अमेय इथे आला आणि त्याने मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीत मतदानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळेच आपण मतदानासाठी भारतात आल्याचं अमेय यानं सांगितलंय.

वर्ध्यातही बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेवाने मतदार केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. अक्षय बहादूरकर असं नवरदेवाच नाव असून पुलगाव येथे नगर परिषद निवडणुकीसाठी नवरदेवाने मतदानाचा हक्क बजावला आहे.

धाराशिवच्या तुळजापूरमध्ये नवरदेव घोड्यावर बसून थेट मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजवायला पोहोचला. लग्नाच्या आधी तुळजापूर येथील संकेत भोजनेनं मतदान केलं आहे.तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील बूथवर जाऊन त्याने आपला मतदानाचा हक्क आधी बजावला.

पंढरपूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान झालं. तेव्हा प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, पण यावेळी तदान केंद्रावर मतदान करायला आलेल्या एका व्यक्तीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. कारण या व्यक्तीने चक्क गब्बरसिंगच्या पोषाखात येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. दत्तात्रय सूर्यवंशी नावाच्या एका नागरिकाने मतदान करायला येताना शोले चित्रपटातील गब्बरसिंगचा लूक केला होता.