
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताने एकही सामना गमावलेला नाही. साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने भारताने जिंकले. तर उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. आता भारताने ऑस्ट्रेलिया पराभूत करताच जेतेपदावर नाव कोरलं जाणार आहे. पण हा विजय वाटतो तितका सोपा नाही. त्यामुळे भारताचे पाच प्लान यशस्वी होणं गरजेचं आहे.

रोहित शर्मा या स्पर्धेत आक्रमक खेळी करत आहे. पण साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे अंतिम फेरीत रोहित शर्मासमोर मिचेल स्टार्क आणि हेझलवूडचं आव्हान असणार आहे. जर हे आव्हान यशस्वीरित्या पेललं तर मोठी धावसंख्या उभारता येईल.

एडम झाम्पावर तुटून पडणं गरजेचं आहे. कारण या स्पर्धेत शमीनंतर सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम झाम्पाच्या नावावर आहे. विराट कोहलीला त्याचा सामना करताना अडचण येऊ शकते. त्यामुळे विराट कोहलीने मधल्या षटकात जोरदार प्रहार करून झाम्पाला बॅटफूटवर टाकणं गरजेचं आहे.

वॉर्नर आणि हेड हे ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून देतात. त्यामुळे जसप्रीत बुमराहवर या दोघांना रोखण्याची जबाबदारी असणार आहे. जर पहिल्या काही षटकांमध्ये जसप्रीत बुमराहची ओव्हर चालली आणि विकेट मिळाले, तर ऑस्ट्रेलियावर दबाव राहील.

मोहम्मद शमी जबरदस्त फॉर्मात आहे. अंतिम सामन्यातही त्याची जादू चालली तर ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवणं कठीण होईल. न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीत त्याने 7 गडी बाद केले होते. त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला.

जडेजा आणि कुलदीप यादवला मधल्या षटकांचा भार व्यवस्थितरित्या पेलावा लागणार आहे. जडेजाने आणि कुलदीपने गडी बाद केले आहेत. त्यामुळे स्कोअर रोखण्यापासून विकेट काढण्याची जबाबदारी या दोघांवर असेल.