
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. या आधी दोन्ही संघात कसोटी मालिका पार पडली. या कसोटी मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स याच्या आईचं 10 मार्च रोजी निधन झालं. आईच्या निधनानंत पॅट कमिन्स याने सोशल मीडियावर भावूक पोस्ट केली आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तिच्या निधनाने कमिन्स कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

पॅटने आपल्या आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये संपूर्ण कमिन्स कुटंबिय आहेत. पॅटच्या लहानपणापासून ते लग्नापर्यंतच्या या प्रवासात त्याची आई या फोटोत दिसत आहे. "मी तुझ्यावर फार प्रेम करतो. तु कायम मनात राहशील", असं पॅटने पोस्टमध्ये लिहिलंय.

पॅट कमिन्स याची आई मारिया कमिन्स यांना कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत गंभीर झाल्याने पॅट टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता.

पॅट तिसऱ्या कसोटीनंतर परतणार होता. मात्र आईची तब्येत गंभीर होत असल्याने त्याने कुटुंबियांसोबतच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पॅटच्या अनुपस्थितीत स्टीव्हन स्मिथने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने पॅट कमिन्स याच्या आईच्या निधनाची माहिती दिली होती. "मारिया कमिन्स याचं निधनाने आम्ही दुखी आहोत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आम्ही पॅटच्या दुखात सहभागी आहोत.", असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्टमध्ये म्हटलं होतं.