
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडची मजबूत पकड आहे. ही पकड ढीली करण्यासाठी भारतीय फलंदाजांचे प्रयत्न सुरु आहेत. 356 धावांची आघाडी मोडून अपेक्षित धावसंख्या देण्याचं मोठं आव्हान आहे. असं असातना रोहित शर्मानंतर विराट कोहली आणि सरफराज खान यांनी अर्धशतकी खेळी केली आहे.

विराट कोहलीने शेवटचं अर्धशतकं 26 डिसेंबर 2023 रोजी झळकावलं होतं. त्यानंतर तो अर्धशतकासाठी कासावीस असल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा तर त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. एकेरी धावांनी त्याचा पाठलाग सुरु केला होता. अखेर हे दृष्टचक्र 10 महिन्यांनी फोडण्यात यश आलं आहे.

विराट कोहलीने कसोटी कारकिर्दितलं 31वं अर्धशतक ठोकलं आहे. विराट कोहलीने 70 चेंडूत 5चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. 71.43 च्या स्ट्राईक रेटने विराट कोहलीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

विराट कोहलीने कसोटीतील 9 हजार धावांचा पल्लाही गाठला आहे. कसोटीत 9 हजार धावा करणारा विराट कोहली हा चौथा भारतीय आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 15921, राहुल द्रविडने 13265 आणि सुनिल गावस्करने 10122 धावा केल्या आहेत.

विराट कोहली आणि सरफराज खान यांच्याकडून भारतीय क्रीडाप्रेमींना फार अपेक्षा आहेत. मोठी भागीदारी करून भारतीय संघावरील पराभवाचं सावट दूर करण्याची जबाबदारी आहे. (सर्व फोटो : बीसीसीआय)