
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या नावावर तीन विक्रमांची नोंद होऊ शकते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम रडारवर आहे.

विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावताच वनडे क्रिकेटमध्ये 50 शतकं करणारा फलंदाज ठरणार आहे. सचिन तेंडुलकरने 49 शतकं केली असून कोहलीने या विक्रमाची बरोबरी केली आहे

वनडे वर्ल्डकपच्या एका पर्वात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त 80 धावांची गरज आहे. 673 धावांसह हा विक्रम सचिनच्या नावावर आहे. विराट कोहलीने आतापर्यंत झालेल्या 9 सामन्यात 594 धावा केल्या आहेत.

विराट कोहीलीने शतक झळकावलं आणि टीम इंडिया जिंकली तर रिकी पाँटिंगचा विक्रमही मोडीत निघेल. रिकी पॉटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दितील 55 शतकं अशी केली आहेत की त्यात संघाला विजय मिळाला आहे. विराटने शतक झळकावलं आणि सामना जिंकला तर हा विक्रमही मोडीत निघेल.

विराट कोहली उपांत्य फेरीत गोलंदाजी करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विराटने गोलंदाजी केली आणि एक विकेट घेतला. आता या सामन्यात विराट कोहलीला गोलंदाजी मिळते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.