
वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. भारताचा सामना न्यूझीलंडशी, तर ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.

रोहित सेनेकडे वर्ल्डकप जेतेपदाचा गेल्या 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. भारताने 10 वर्षांपूर्वी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत एकाही आयसीसी स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आली नाही.

गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने भारताचा सामना चौथ्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडशी होणार आहे. यापूर्वी हे दोन्ही संघ 2019 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भिडले होते. हा सामना न्यूझीलंडने 18 धावांनी जिंकला होता.

मुंबईत गेल्या काही दिवसात हलक्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे या दिवशी पाऊस पडला तर काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला. आयसीसीने बाद फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे.

राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही आणि डकवर्थ लुईस नियम लागू पडत नसेल तर भारताला फायदा होईल. कारण गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी आहे.

आयसीसी नियमानुसार, राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही तर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळेल.