
भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये पहिला वनडे सामना रंगला. हा सामना बरोबरीत सुटल्याने भारताने ऑस्ट्रेलियाचा एक विक्रम मोडीत काढला आहे. भारतीय संघ आता दुसऱ्या नंबरला असून ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानावर ढकललं आहे.

वनडे क्रिकेट इतिहासात भारतीय संघाचा 1991 मध्ये पहिला सामना बरोबरीत सुटला होता. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 126 धावा करत सामना बरोबरीत सोडवला होता. त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्ध सामना बरोबरीत सोडवल्यानंतर आता ही संख्या दहावर पोहोचली आहे.

भारताने आतापर्यंत 1056 वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी 559 सामन्यात विजय आणि 443 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यात दहा सामने टाय झाले आहेत. यामुळे भारतीय संघ आता सामना बरोबरीत सोडवणाऱ्या संघांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.

तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने वनडे क्रिकेटमध्ये 1000 सामने खेळले आहेत. यात 609 सामने जिंकले असून 348 सामने गमावले आहेत. तसेच नऊ सामने बरोबरीत सोडवले आहेत.

वनडे क्रिकेटमध्ये सामने बरोबरीत सोडवणाऱ्या संघांच्या यादीत वेस्ट इंडिज आघाडीवर आहे. वेस्ट इंडिज संघ 874 वनडे सामने खेळला असून 420 मध्ये विजय आणि 412 सामने गमावले आहेत. तसेच 11 सामने बरोबरीत सोडवले आहेत. (सर्व फोटो- ट्वीटर)