
आयपीएल 2024 स्पर्धेतील आठवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला. मुंबईने गोलंदाजीची निवड केली पण सामन्यावर हैदराबादच्या फलंदाजांची पकड दिसली.

पहिल्या दहा षटकात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर यावेळी चिंता स्पष्ट दिसत होती.

सनरायझर्स हैदराबादने पहिल्या 10 षटकात 148 धावा केल्या. आयपीएल स्पर्धेतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी खेळी आहे. पहिल्या 10 षटकात आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. यावेळी एकूण 14 चौकार आणि 10 षटकार मारले.

सनरायझर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने यावेळी 19 चेंडूत 54 धावा केल्या. तर एडन मार्करमने 13 धावांची खेळी केली. ट्रेविस हेड 24 चेंडूत 62 धावा करून बाद झाला होता. तर मयंक अग्रवाल 13 चेंडूत 11 धावांवर तंबूत परतला होता.

आयपीएल 2021 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने अशीच सनरायझर्स हैदराबातची धुलाई केली होती. अबुधाबीत खेळलेल्या सामन्यात 10 षटकात 131 धावा केल्या होत्या. यावेळी एकूण 16 चौकार आणि 5 षटकार मारले होते.