
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच 18वं पर्व सुरू होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. या दोन आठवड्यात एकूण 19 सामने खेळले गेले आहेत. यात आयपीएल नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पाच खेळाडूंना दंड ठोठावण्यात आला आहे. इतकंच काय तर एका खेळाडूला दोन आठवड्यात दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे.

30 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात पांड्याला संथ गतीने षटक टाकल्याने शिक्षा झाली.

संजू सॅमसनच्या जागी राजस्थान रॉयल्सचे तीन सामन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या रियन परागलाही दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर-रेटमुळे परागला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतलाही दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण न केल्याबद्दल पंतला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यासाठी मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही जोडण्यात आला.

लखनौ सुपर जायंट्सचा युवा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीला दोनदा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात प्रियांश आर्यला बाद केल्यानंतर त्याने नोटबुक सेलिब्रेशन केल्याबद्दल दिग्वेशला त्याच्या मॅच फीच्या 25% दंड ठोठावण्यात आला. तसेच, एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दिग्वेश राठी पुन्हा नोटबुक सेलिब्रेशन करताना दिसला. यावेळी मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला. 2 डिमेरिट पॉइंट्स ठोठावण्यात आले आहेत.