
आयपीएल २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने चौथ्या विजयाची नोंद केली आहे. चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी १७७ धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान मुंबई इंडियन्सने १५.४ षटकात पूर्ण केलं. रोहित शर्माने नाबाद ७६ आणि सूर्यकुमार यादवने नाबाद ६८ धावांची खेळी केली.

रोहित शर्माने ३३ चेंडूत ५० धावा केल्या. बऱ्याच कालावधीनंतर रोहित शर्माला सूर गवसला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रोहितने सीएसकेविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि हंगामातील त्याचे पहिले अर्धशतक झळकावले.

रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नववं अर्धशतक झळकावलं आहे. आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध सर्वाधिक ५०+ धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.यापूर्वी विराट कोहली, डेविड वॉर्नर आणि शिखर धवनने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ९ अर्धशतकं झळकावली आहेत.

रोहित शर्मा हा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २६४ सामन्यांमध्ये सुमारे २९.५० च्या सरासरीने ६७७०* धावा केल्या आहेत. या काळात मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराने ४३ अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत.

रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर असून त्याने ८३२६ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने ६७७०हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी शिखर धवन दुसर्या स्थानावर होता. त्याने ६७६९ धावा केल्या आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)