
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 42 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर विराट कोहलीने अर्धशतक झळकावलं. तसेच घरच्या मैदानावर गेल्या काही दिवसांपासूनचा धावांचा दुष्काळ संपवला. चिन्नास्वामी स्टेडियमवर गेल्या तीन सामन्यांमध्ये विराट कोहलीला फक्त 30 धावा करता आल्या होत्या. पण राजस्थान रॉयल्सविरुद्ध जबरदस्त पुनरागमन केले आणि अर्धशतक झळकावलं.

आयपीएल 2025 मध्ये विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याने 9 सामन्यांमध्ये 65.33 च्या सरासरीने 392 धावा केल्या आहेत. या पर्वात कोहलीने पाच अर्धशतके झळकावली आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 144.11 आहे. विराट कोहली आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. सध्या ऑरेंज कॅप गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनकडे आहे.

या पर्वात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या गेल्या तीन सामन्यांमध्ये विराट कोहली अपयशी ठरला होता. पण राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने जोरदार पुनरागमन केले. यासोबतच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

विराट कोहलीने आता टी20 क्रिकेट इतिहासात प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला आहे. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने 62 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यासह त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडला.

कोहली टी20 क्रिकेटमध्ये 50पेक्षा जास्त धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. टी20 मध्ये 50 पेक्षा जास्त धावा करण्याच्या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलने 110 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 111 वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अव्वल स्थानी आहे. त्याने 117 वेळा अशी कामगिरी केली आहे. जोस बटलरने 95 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)