
मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज लसिथ मलिंगा पुन्हा संघात परतला आहे. पण यावेळी गोलंदाज म्हणून नाही. तर गोलंदाज प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणार आहे.

2021 मध्ये आयपीएलला अलविदा करणारा लसिथ मलिंगा राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून दिसला. आता यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाजाला मुंबई इंडियन्स संघात परत आणण्यात फ्रँचायझीला यश आले आहे.

लसिथ मलिंगा आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा शेन बाँड मुंबई फ्रँचायझीचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत होता.

श्रीलंकेचा लसिथ मलिंगा हा आयपीएलमध्ये फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या काही खेळाडूंपैकी एक आहे. 2009 ते 2021 पर्यंत एकूण 139 सामने खेळलेल्या मलिंगाने 195 बळी घेतले आहेत. यात मुंबईने पाचवेळे जेतेपद मिळवलं आहे.

निवृत्तीनंतर राजस्थान रॉयल्स संघाचे श्रीलंकेचे प्रशिक्षक कुमार संगकारा याच्या आग्रहास्तव मलिंगा राजस्थान संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक झाला. कराराची मुदत संपल्याने मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याला परत आपल्यासोबत घेतलं आहे.