
आयपीएलचं 18 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने येतील.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना सीएसकेच्या होमग्राउंडवर होणार आहे. या सामन्यासाठी भरपूर अवधी आहे. पण धोनीने सरावात कोणतीही कसर सोडलेली नाही. त्यामुळे धोनीला फलंदाजी करताना पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

धोनीबाबत क्रेझ कायम असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, एमएस धोनीने आयपीएल 2025 साठी त्याच्या बॅटचे वजन 20 ग्रॅमने कमी केले आहे.

रिपोर्ट्सनुसार, मेरठमधील क्रिकेट उत्पादक कंपनी सॅन्सपॅरेल्स ग्रीनलँड्स प्रायव्हेट लिमिटेडने अलीकडेच धोनीला चार बॅट दिल्या. सूत्रांनी सांगितले की, धोनीच्या घरी आलेल्या या नवीन बॅटचे वजन सुमारे 1230 ग्रॅम आहे आणि त्याचा आकार पूर्वीसारखाच आहे.

धोनीच्या फलंदाजीच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. 2008 पासून त्याने आयपीएलमध्ये 264 सामने खेळले आहेत. या काळात त्याच्या बॅटने 229 डावांमध्ये 5243 धावा केल्या. धोनीने 24 अर्धशतके ठोकली आहेत. त्याचा सर्वोच्च धावसंख्या नाबाद 84 धावा आहे.