
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. दुसरीकडे, टीम इंडियाची बांधणी व्यवस्थित झाली आहे की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. कारण या संघातून मोहम्मद सिराजला वगळण्यात आलं आहे. दुसरीकडे मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह फिट आहेत की नाही याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. कारण त्याच्याऐवजी संघात हार्षित राणा याची बदली खेळाडू म्हणून निवड केली आहे. बुमराह शेवटचा वनडे सामने खेळेल असं सांगण्यात येत आहे. पण त्याची पाठदुखीचा त्रास पाहता पुढे काय निर्णय घेतला जाईल अजूनही गुलदस्त्यात आहे. त्याचा मेडिकल रिपोर्ट न्यूझीलंडच्या डॉक्टरांकडे पाठवण्यात आला आहे.

न्यूझीलंडच्या वैद्यकीय अहवालात जर जसप्रीत बुमराहला आरामाचा सल्ला दिला गेला. तर त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणं कठीण आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी संघात मोहम्मद सिराजची निवड होण्याची शक्यता आहे. बुमराहचा बॅकअप खेळाडू म्हणून सिराजला संधी मिळेल असं सांगण्यात येत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशसोबत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेपूर्वी बुमराह फिट होणार नसल्याचं अहवाल दिला गेला तर मात्र त्याला संघातून वगळलं जाईल. त्याच्याऐवजी संघात अनुभवी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशवी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.