
पाच वेळा विजेता राहिलेल्या मुंबई इंडियन्स संघाची स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक राहिली. मुंबईने सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात कमबॅक केलं. पण या आधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मुंबई इंडियन्सला स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय खेळत राहावे लागेल. जसप्रीत बुमराह पुढील दोन आठवडे आयपीएल सामने खेळू शकणार नाही, असे वृत्त आहे. बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी करतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असला तरी त्याला अद्याप फिटनेस क्लिअरन्स मिळालेला नाही.

बुमराहवर बीसीसीआयची वैद्यकीय टीम आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) क्रीडा वैद्यकीय टीम देखरेख ठेवून आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाठीची दुखापत जाणवली होती. बुमराह तेव्हापासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भाग घेतला नव्हता आणि अजूनही आयपीएलमध्ये खेळण्याबाबत खात्री नाही.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सध्या बुमराह वेगाने बरा होत आहे. पण तो क्रिकेटमध्ये कधी परतेल हे नक्की सांगता येत नाही. तो हळूहळू त्याच्या कामाचा भार वाढवत आहे. जर हे असेच चालू राहिले तर तो पुढील दोन आठवड्यात खेळण्यास तयार होऊ शकतो."

वृत्तानुसार, जर बुमराह पुढील दोन आठवडे खेळला नाही तर मुंबई इंडियन्सला या काळात आणखी चार सामने त्याच्याशिवाय खेळावे लागतील. याचा अर्थ बुमराह आयपीएलच्या पहिल्या 6 ते 7 सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड कसोटी मालिकेसाठी बुमराह तंदुरुस्त होईल असे बीसीसीआय किंवा एनसीएमध्ये कोणीही स्पष्ट सांगत नाही. पण लवकर बरा होत असल्याचे सांगितले जात आहे. बुमराहच्या बाबतीत कोणतीही घाई नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, डॉक्टर, फिजिओ आणि खेळाडू 100% तंदुरुस्त असला तरच परवानगी देतील. (फोटो- टीव्ही कन्नड)