
आयपीएल 2026 स्पर्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. या लीगची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सर्व 10 फ्रँचायझींनी आधीच तयारी सुरू केली आहे. पण गतविजेत्या आरसीबी त्यांचे घरचे सामने कोणत्या स्टेडियममध्ये खेळतील हे अद्याप निश्चित झालेले नाही.

आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 11 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तेव्हापासून चिन्नास्वामी स्टेडियमवर एकही सामना झालेला नाही. आगामी आयपीएल सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर होतील, अशी चर्चा आहे.

आरसीबी फ्रँचायझीने त्यांचे घरचे सामने आयोजित करण्यासाठी दोन मैदाने निवडली आहेत. यात आरसीबी फ्रँचायझीने चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांचे घरचे सामने आयोजित करण्यास रस दाखवला आहे. पण सामने होण्यासाठी त्यांनी केएससीएला काही अटी पूर्ण करण्यास सांगितले आहे.

आरसीबीने 16 जानेवारी रोजी सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती, त्यात त्यांनी म्हटले होते की, "स्टेडियममध्ये 300 ते 350 एआय कॅमेरे बसवण्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला औपचारिक प्रस्ताव देण्यात आला आहे. हे कॅमेरे स्टेडियम आणि त्याच्या आसपासच्या परिसराचे निरीक्षण करतील आणि गर्दी व्यवस्थापनात मदत करतील."

आरसीबी फ्रँचायझीने हा प्रस्ताव केएससीएकडेच ठेवला नाही तर एआय कॅमेरे बसवण्याचा खर्चही उचलेल असे म्हटले आहे. कॅमेरे बसवण्यासाठी लागणारा अंदाजे ४.५ कोटी रुपयांचा खर्च ते पूर्णपणे उचलेल असे आरसीबीने म्हटले आहे. दरम्यान, आगामी आयपीएलमध्ये आरसीबी त्यांचे होम सामने दोन वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळणार असल्याचे वृत्त आहे. (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)