
आयसीसीने नुकतीच कसोटी संघाची क्रमवारी जाहीर केली आहे. 12 कसोटी खेळणाऱ्या कसोटी संघांचा एक प्रकारे लेखाजोखा मांडला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांनी धडक मारली आहे. असं असताना आयसीसी क्रमवारीत हे दोन संघ टॉपला आहेत. पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, तर दुसऱ्या स्थानावर दक्षिण अफ्रिका आहे.

36 कसोटी सामन्यांमध्ये 4531 गुणांसह 126 मानांकन मिळवणारा ऑस्ट्रेलियन संघ आयसीसी कसोटी संघांच्या नवीन क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन वर्षात खेळलेल्या 17 कसोटीपैकी 11 सामन्यात विजय, चार सामन्यात पराभव आणि 2 सामने ड्रॉ राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 63.73 इतकी आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 30 कसोटी सामन्यांतून एकूण 3355 गुण मिळवले आहेत. तसेच, 112 रेटिंग मिळवून आयसीसी कसोटी संघांच्या क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. इतकंच काय तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत 69.44 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे.

टीम इंडियाला दोन मालिका गमवल्याने मोठा फटका बसला आहे. न्यूझीलंडविरुद्ध 3-0 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 ने मालिका गमवावी लागली आहे. त्याचा परिणाम आयसीसी क्रमावारीवर झाला आहे. नव्या क्रमवारीत टीम इंडियाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

भारतीय संघाने 39 सामन्यांतून 4248 गुण मिळवले आहेत. दोन मालिका पराभवांमुळे टीम इंडियाच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. एकूण 109 रेटिंगसह टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे.

इंग्लंड (106) रेटिंगसह चौथ्या स्थानावर, न्यूझीलंड (96) रेटिंगसह पाचव्या स्थानावर, श्रीलंका (87) रेटिंगसह सहाव्या आणि पाकिस्तान (83) रेटिंगसह सातव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज (75) रेटिंगसह आठव्या, बांगलादेश (65) रेटिंगसह नवव्या आणि आयर्लंड (26) रेटिंगसह दहाव्या स्थानावर आहे. तसेच, अफगाणिस्तान (19) रेटिंगसह 11 व्या आणि झिम्बाब्वे (0) रेटिंगसह 12व्या स्थानावर आहे.