IND vs SL: श्रीलंकेविरुद्धची गॉल टेस्ट भारतासाठी ऐतिहासिक, 38 कर्णधारांच्या जोरावर हा पल्ला गाठणार
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतासाठी ऐतिहासिक असणार आहे. आतापर्यंत हा पल्ला फक्त दोन संघांनी गाठला आहे.

भारतीय संघासाठी श्रीलंकेविरुद्धचा गॉल कसोटी सामना ऐतिहासिक असणार आहे. कसोटी क्रिकेटमधील एक मैलाचा दगड भारतीय संघ गाठणार आहे. भारतीय संघ मैदानात उतरताचा एक इतिहास रचणार आहे. आतापर्यंत हा पल्ला गाठताना 94 वर्षांच्या इतिहासात भारताच्या 38 कर्णधारांनी नेतृत्व केलं आहे. (Photo: Srilanka cricket/BCCI)

गॉल कसोटी सामना भारतीय संघाचा 600वा कसोटी सामना असणार आहे. 600 कसोटी सामना खेळणारा भारत आशिया खंडातील पहिला देश ठरणार आहे. तर जगातील तिसरा देश होण्याचा मान मिळवणार आहे. भारताआधी इंग्लंडने 1097 आणि ऑस्ट्रेलियाने 882 कसोटी सामने खेळले आहेत. (Photo: Srilanka cricket/BCCI)

भारताने 1932 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. या संघाचं कर्णधारपद सीके नायडू यांनी भूषवलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 94 वर्षांच्या इतिहासात भारताच्या 38 कर्णधारांनी नेतृत्व केलं आहे. यात मंसूर अली खान पतौडी, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, धोनी, विराट कोहली या सारख्या यशस्वी कर्णधारांचा समावेश आहे. 600व्या कसोटी सामन्याचं नेतृत्व शुबमन गिल करेल. (Photo: Srilanka cricket/BCCI)

भारताने आतापर्यत खेळलेल्या 599 कसोटी सामन्यांपैकी 188 सामने गमावले आहेत. तर 186 सामन्यात विजय मिळवला आहे. तर उर्वरित सामने ड्रॉ झाले आहेत. भारताची विजयी टक्केवारी ही 31.13 इतकी आहे. (Photo: Srilanka cricket/BCCI)

शुबमन गिलच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 सामन्यात विजय आणि तीन सामने गमावले आहेत. श्रीलंकेविरुद्ध मागच्या सहा कसोटी सामन्यात भारताने एकही गमावलेला नाही. तशीच आशा आता या मालिकेत आहे. (Photo: Srilanka cricket/BCCI)