
आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी आणखी काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या लिलावापूर्वी तीन खेळाडूंचा समावेश अचानकपणे यादीत झाला आहे. त्यामुळे मेगा लिलावात खेळाडूंची संख्या 574 वरून 577 झाली आहे.

शेवटच्या क्षणी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं नाव यादीत टाकलं गेलं आहे. आर्चरने मेगा लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. पण इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सूचनेनंतर त्याचं नाव वगळण्यात आलं होतं. पण आता ईसीबीकडून मंजुरी मिळाल्याने आर्चरचं नाव यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे.

अमेरिकेचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकरनेही मेगा लिलावात नाव नोंदणी केली होती. मात्र त्यालाही वगळण्यात आलं होतं. पण काही फ्रेंचायझींनी त्याचं नाव यादीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला आणि त्याला लिलावात स्थान मिळालं आहे.

मुंबईच्या हार्दिक तामोरेलाही 574 जणांची यादी जाहीर झाली तेव्हा वगळण्यात आलं होतं. पण काही फ्रेंचायझींनी त्याच्या नावाचा आग्रह धरला आणि त्याला 30 लाखांच्या बेस प्राईससह अंतिम यादीत स्थान मिळालं आहे.

आयपीएलच्या 18 व्या पर्वासाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा लिलाव पार पडणार आहे. सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये हा लिलाव पार पडणार असून आता 577 खेळाडूंची नावं आहे. यापैकी जास्तीत जास्त 204 खेळाडूंची निवड केली जाईल.