
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना एडिलेडच्या ओव्हल मैदानात होणार आहे. 6 डिसेंबरला डे नाईट सामना होणार आहे. या सामन्यात पिंक बॉलचा वापर केला जाणार आहे. असं असताना हा सामना विराट कोहलीसाठी खास असणार आहे.

विराट कोहली दुसऱ्या कसोटी सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत असा विक्रम एडिलेडच्या भूमीवर कोणीही करू शकलेलं नाही. एडिले़डचं मैदान विराट कोहलीला खूप भावलं आहे.

एडिलेडच्या ओव्हल मैदानावर विराट कोहलीने आतापर्यंत 11 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 73.61 च्या सरासरीने 957 धावा केल्या आहेत. यात 5 शतकांचा समावेश आहे. ही आकडेवारी पाहता एडिलेडचं ओव्हल मैदान विराटसाठी लकी असल्याचं दिसत आहे.

विराट कोहलीने एडिलेडच्या डे नाईट सामन्यात 43 धावा करताच या मैदानावर 1000 धावा पूर्ण होणार आहेत.अशी कामगिरी करणारा पहिला विदेशी खेळाडू ठरणार आहे.

कोहलीव्यतिरिक्त ब्रायन लाराने या मैदानावर 940 धावा केल्या आहेत. कोहलीने एडिलेडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामने खेळले आहेत. यात 63.62 च्या सरासरीने 509 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.