
मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज झाला आहे. ठरलं तर मग, सुख म्हणजे नक्की काय असतं, अबोली, घरोघरी मातीच्या चुली, लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि प्रेमाची गोष्ट या मालिकांमध्ये पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनीमधील अद्वैत-कला आणि प्रेमाची गोष्टमधील मुक्ता-सागरचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असल्याने दोन्ही जोड्यांसाठी यंदाचा गुढीपाडवा खास असणार आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शालिनी आणि नित्या पहिल्यांदा एकमेकींसमोर येणार आहेत. शालिनीच्या पापांचा घडा आता भरलाय. त्यामुळे हा गुढीपाडवा शालिनीसाठी नवा धमाका घेऊन येणार आहे.

'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये 15 वर्षांनंतर रणदिवे आणि विखे-पाटील कुटुंब एकत्र गुढी उभारणार आहेत. सौमित्र आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सयाजीरावांनी एकत्र गुढी उभारण्यास सहमती दिली आहे. पाडव्याच्या गोडव्याप्रमाणे दोन्ही कुटुंबांमधला नात्याचा गोडवाही वाढेल का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.

ठरलं तर मग आणि अबोली मालिकेतही कलाकारांनी जल्लोषात गुढी उभारली आहे. प्रेक्षकांना हे गुढी पाडवा विशेष एपिसोड्स मालिकांच्या आगामी भागात पहायला मिळणार आहेत.