
बारामती तालुक्यातील मोढवे गावात राहणाऱ्या, अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या सूरज चव्हाणची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. सूरजने आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने बिग बॉसच्या माध्यमातून देशातील प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता सूरज त्याच्या खासगी आयुष्यासाठी चर्चेत आहे. त्याने पत्र्याच्या घराच्या जागी मेहनतीने आलिशान बंगला बांधला आहे. या बंगल्यासाठी त्याने किती पैसे खर्च केले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

अवघ्या महाराष्ट्राचा गुलिगत स्टार असलेला सूरज चव्हाण गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. सुरुवातीला त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. त्याने केलेल्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आता सूरज चव्हाणच्या घराची चर्चा रंगली आहे. सूरजने प्रचंड मेहनतीने आलिशाय बंगला उभा केला आहे. या बंगल्याचे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

सूरज चव्हाण हा मोढवे या छोट्याश्या गावात राहणारा मुलगा आहे. टिकटॉकवरील रिल्सने त्याला रातोरात स्टार बनवले होते. पण भारत सरकारने टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर त्याने इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगली प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर सूरजला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये जाण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. त्याने बिग बॉस मराठी 5चा ताज जिंकला.

हळूहळू सूरज आणखी चर्चेत आला. अनेकांनी सूरजच्या मोढवे येथील घरी जाऊन मुलाखती घेतल्या. या मुलाखतींमध्ये त्याचे घर दाखवण्यात आले होते. सूरज हा पत्र्याच्या एका खोलीत राहात होता. आता त्याने या पत्र्याच्या घराच्या जागेवर आलिशाय दोन मजल्याचा बंगला बांधला आहे. उंच सिलिंग, मॉड्यूलर किचन, घरात छोटं गार्डन अशा अनेक सुविधा सुरजच्या घरात दिसल्या. तसेच वरच्या मजल्यावर बेडरुम, बाल्कनी देखील दिसली.

अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजने या आलिशाय बंगल्यासाठी किती खर्च केला असावा? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला घर बांधण्यासाठी मोठी मदत केली आहे. गृहप्रवेश केल्यानंतर सूरजने अजित दादांचे आभार मानले आहेत. सूरजने बिग बॉस जिंकल्यानंतर मिळालेल्या बक्षिसातील काही रक्कम (14 ते 15 लाख रुपये) आणि अजित दादांनी केलेल्या मदतीमधून घर उभे केले आहे. अंदाजे त्याने घराला 35 ते 40 लाखांपेक्षा जास्त खर्च केल्याचे म्हटले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.