थिएटरमध्ये सुपरफ्लॉप, पण OTT वर नशीब चमकलं! दोन वर्षांनी टॉप 10मध्ये एण्ट्री
थिएटरमधील कामगिरीनंतर OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपटांना नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. या चित्रपटाच्या बाबतीतही असंच चित्र पाहायला मिळत आहे.

थिएटरमध्ये अपेक्षित कामगिरी केल्यानंतर काही दिवसांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात. यामुळे निर्मात्यांना बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ओटीटी डील्स या दोन्हीमधून आर्थिक फायदा मिळतो. मात्र याचा सर्वांत मोठा फायदा त्या चित्रपटांना होतो, जे बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. ओटीटीवर त्यांना नवसंजीवनी मिळते.
2024 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कंगुवा’ चित्रपट थिएटरमध्ये अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. मात्र, आता तब्बल दोन वर्षांनंतर या चित्रपटाला OTTवर नवी प्रेक्षकवर्ग मिळताना दिसत आहे. सध्या ‘कंगुवा’ जिओ हॉटस्टारच्या भारतातील टॉप 10 यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.
‘कंगुवा’ हा मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला फँटसी अॅक्शन चित्रपट होता. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 350 कोटी रुपयांचा खर्च झाला होता, तर थिएटरमधून जवळपास 106 कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे चित्रपटाच्या थिएटरमधील व्यवसायाला अपेक्षित यश मिळालं नाही.
‘कंगुवा’ची कथा दोन वेगवेगळ्या काळांमध्ये पुढे जाते. एका बाजूला आधुनिक काळातील फ्रान्सिस थियोडोर आणि जेटाची गोष्ट आहे, तर दुसरीकडे शेकडो वर्षांपूर्वीच्या योद्धा कंगुवाची कथा पाहायला मिळते. या दोन्ही कथांना पुनर्जन्माच्या संकल्पनेतून जोडण्यात आलं आहे.
‘कंगुवा’मध्ये बॉबी देओलने उधिरन नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली आहे. ‘अॅनिमल’नंतर बॉबी देओलच्या खलनायकी भूमिकांबद्दल प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे ‘कंगुवा’मध्ये त्याचा लूक आणि व्यक्तिरेखा हा चित्रपटातील चर्चेचा एक भाग ठरला.