
टी 20 विश्वचषकातील विजेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाली. भारतात आल्यानंतर दिल्ली आणि नंतर मुंबईत आलेल्या भारतीय संघाला जनतेचे भरभरुन प्रेम मिळाले.

या प्रेमाने भरावलेल्या भारतीय संघाने 'थँक्यू इंडिया…' म्हणत भारतीय जनतेचे आभार मानले. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत तुफान गर्दी पाहायला मिळाली.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले होते. अनेक क्रिकेट चाहत्यांची गर्दी काहीशी अनियंत्रित झाली. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत काढण्यात आलेल्या परेडमध्ये अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या परेडनंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसराची अवस्था काय झाली होती, याचे काही फोटो समोर आले आहेत.

मुंबईतील मरीन ड्राईव्ह भागात ठिकठिकाणी चपलांचा ढीग पाहायला मिळाला. त्यासोबत रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते.

चर्चेगट स्टेशन परिसरात जाणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात चपला आढळून आल्या. तसेच याठिकाणी पाण्याची बॉटल, बॅग, सनग्लासेस, टोपी यांसह विविध गोष्टी रस्त्यावर पडल्याचे पाहायला मिळाले.

त्यासोबतच मरीन ड्राईव्ह परिसरात जमलेल्या लाखो क्रिकेटप्रेमींनी पोलिसांचे बॅरिगेट्सचेही नुकसान केले. यामुळे मरीन ड्राईव्हसह चर्चगेट परिसराची दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या सोशल मीडियावर टीम इंडियाच्या परेडनंतरची अनेक दृष्य समोर येत आहेत. यावर अनेक संतापजनक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहे.