
डोंगरकडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या तळीये गावातील स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज तळीये गावाद दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यपाल कोश्यारी हेलिॉप्टरने मुंबईवरुन महाडला गेले आणि तिथून रस्ते मार्गानं ते तळीये गावात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलारही उपस्थित होते.

तळीये गावात पोहोचल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि अन्य अधिकाऱ्यांनी राज्यपालांना घटनेची माहिती दिली. राज्यपालांनीही घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तळीयेतील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.

त्यावेळी बोलताना मृतांच्या नातेवाईकांच्या आणि गावातील अन्य नागरिकांच्या पुनर्वसनासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करेल. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.

तळीये गावाची पाहणी केल्यानंतर राज्यपाल शेलार यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. त्यावेळी त्यांनी चिपळूण आणि खेड तालुक्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन्ही शहर आणि तालुक्यात झालेल्या हानीबद्दल सादरीकरण केलं.