
जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. सामान्यांपासून ते बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांचीच साईचरणी अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील अधिकृत डिलर्सनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.

टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ही कार बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच तिचे पहिले युनिट साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आले आहे.

वाहन उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्या आपले नवीन मॉडेल लाँच करताना त्याला यश मिळावे, या हेतूने पहिले वाहन देवाच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा पाळतात. टाटा मोटर्सच्या पुणे विभागातील सर्व डिलर्सनी एकत्र येत २५ लाख ७० हजार रुपये किंमतीची ही अत्याधुनिक टाटा सिएरा कार संस्थानला प्रदान केली.

टाटा सिएरा ही गाडी टाटा मोटर्सच्या ताफ्यातील एक प्रीमियम मॉडेल मानली जाते. शिर्डी येथील संस्थानच्या परिसरात हा हस्तांतरण सोहळा पार पडला. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते आणि टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील विविध डिलर्सच्या उपस्थितीत वाहनाचे विधीवत शास्त्रोक्त पूजन करण्यात आले.

मंत्रोच्चाराच्या घोषात गाडीला हार घालून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. पूजेनंतर डिलर्सच्या वतीने गाडीची चावी अधिकृतपणे संस्थानकडे सोपवण्यात आली. याप्रसंगी संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्सच्या सर्व डिलर्सचा शाल, श्रीफळ आणि साईबाबांची मूर्ती देऊन यथोचित सत्कार केला.

यावेळी बोलताना गाडीलकर म्हणाले की, टाटा मोटर्सने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. ही नवीन कार संस्थानच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी, पाहुण्यांच्या सुविधेसाठी आणि सेवाभावी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. तर टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींनी साईबाबांच्या आशीर्वादाने आमच्या नवीन प्रवासाची सुरुवात व्हावी, या हेतूने आम्ही हे वाहन अर्पण केले आहे, अशा भावना व्यक्त केल्या.