क्रिकेटच्या जगात आता भारतच धुरंधर! इंग्लंड, कांगारु अन् आफ्रिकेलाही जमलं नाही ते ‘टीम इंडिया’नं केलं
India Vs Japan Match News : पाऊस आणि ओल्या मैदानामुळे 3 तासांच्या विलंबानंतर भारत-जपान सामना सुरू झाला. सामना 5-5 षटकांचा करण्यात आला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांत 4 बाद 32 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 16 धावा केल्या, तर अभिषेक शर्मा 0 आणि संजू सॅमसन 9 धावांवर बाद झाले.

जपानमधी सानो येथे पाऊस आणि ओल्या मैदानामुळे तब्बल 3 तासांच्या विलंबानंतर सुरू झालेला भारत आणि जपान यांच्यातील एकमेव टी-20 सामना केवळ 5-5 षटकांचा खेळवण्यात आला. या अटीतटीच्या सामन्यात भारताने जपानवर 2 धावांनी निसटता विजय मिळवत एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
या ऐतिहासिक विजयासोबतच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 सामने जिंकणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव संघ ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. 5 षटकांत भारताला 4 बाद केवळ 32 धावांपर्यंतच मजल मारता आली.
कर्णधार श्रेयस अय्यरच्या 16 धावांचा अपवाद वगळता, अभिषेक शर्मा (0) आणि संजू सॅमसन (9) यांसारखे स्टार फलंदाज जपानी गोलंदाजीसमोर सपशेल अपयशी ठरले. मात्र, भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाची लाज वाचवली. विजयासाठी मिळालेले 33 धावांचे सोपे आव्हान पार करताना जपानच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी 5 षटकांत 3 बाद 30 धावांवर रोखले.
वॉशिंग्टन सुंदरने भेदक गोलंदाजी करत 2 महत्त्वाचे बळी घेतले. तर, शेवटच्या षटकात जपानला विजयासाठी 8 धावांची गरज असताना अक्षर पटेलने अचूक मारा करत भारताच्या झोळीत हा ऐतिहासिक विजय टाकून दिला. भारतीय संघाच्या या अविस्मरणीय प्रवासावर नजर टाकल्यास, भारताने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला पहिला टी-20 विजय नोंदवला होता.
त्यानंतर 2022 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध भारताने 100 विजयांचा टप्पा पार केला होता. आणि आता 2026 मध्ये जपानविरुद्ध मिळवलेल्या या थरारक विजयासह (सुपर ओव्हरमधील विजयांसह) भारताने टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 200 विजयांचा सुवर्णमयी पल्ला गाठला आहे.