
छोट्या पडद्यावरील संस्कारी सून म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तिने आजवर प्रत्येक मालिकांमध्ये साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. मग ती होणार सून मी ह्या घरची मालिका असो वा प्रेमाची गोष्ट मालिकेतील तिची भूमिका असो. तिच्या प्रत्येक भूमिकेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत काम करणाऱ्या तेजश्रीची एक पोस्ट चर्चेत आहे. ती नेमकं काय म्हणाली वाचा...

तेजश्री प्रधानने तिच्या अधिकृत इन्साग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. तिने, आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणे !!! यशासकट अन् अपयशासकट.. न थकता.. न डगमगता.. उरी विश्वास बाळगून.. की जाणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो ! ते सर्व वेचत चालत राहणे.आणि मग, एक छानसा विसावा.. त्यात थोडा आढावा ! करून ठेवलेल्या गोष्टींचा.. चुकलेल्याचा.. बरोबर गोष्टींचा.. मायबाप प्रेक्षकाच्या प्रेमाचा.. टिकेचा … असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुढे ती म्हणाली, आपुलकी दाखवणाऱ्या सहकलाकारांचा.. हितचिंतकांचा आणि निंदकांचा… मग, अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं, “आमचं लक्ष आहे.. तुमच्या वाटचालीवर” आणि मग, मन पुन्हा नव्या जोमाने विश्वासाने पुढे चालू लागतं.. पुन्हा एकदा !! ह्या वेळी हे कोणीतरी फार महत्वाचं आहे माझ्या कलाक्षेत्रातल्या प्रवासासाठी… महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४... महाराष्ट्र शासनाचे आणि माननीय मंत्री, सांस्कृतिक कार्य, माननीय अॅड. आशिष शेलार यांचे खुप खुप आभार या केलेल्या सन्मानासाठी.

तेजश्रीने ही पोस्ट शेअर करत महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४ स्विकारतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये ती आशिष शेलार यांच्या हत्ये पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. तेजश्रीने हा आनंदाचा क्षण सर्वांसोबत शेअर केला आहे.

दरम्यान, तेजश्रीने या पुरस्कार सोहळ्यासाठी मेहंदी रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. त्यावर सिंपल मेकअप, केसात गजरा, मोकळे केस असा लूक केला आहे. सध्या सर्वत्र तेजश्रीच्या या लूकची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी तेजश्रीच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहे. तेजश्रीसाठी हा आनंदचा क्षण आहे.