थलपती विजय हे मुख्यमंत्री बनल्यानंतरही मुलाचं मौन; म्हणाले “त्याला बळजबरी करणार नाही..”
सी. जोसेफ विजय हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. परंतु यावर अद्याप त्यांची पत्नी किंवा मुलांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. अशातच थलपती विजय यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल आहे, ज्यामध्ये ते मुलाबद्दल बोलले आहेत.

टीव्हीकेचे प्रमुख आणि सुपरस्टार सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. परंतु या विजयानंतर आणि शपथविधी सोहळ्यानंतरही त्यांची पत्नी किंवा मुलांकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही.

विजय यांची पत्नी संगीता सोरनलिंगम किंवा दोन्ही मुलांनीही सोशल मीडियावर वडिलांसाठी कोणतीही पोस्ट लिहिली नाही. इतकंच नव्हे तर मुलगा जेसन संजयने विजय यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचीही चर्चा आहे. विजय यांचं अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत नाव जोडलं जात असल्याने पिता-पुत्राच्या नात्यात कटुता निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.

या चर्चांदरम्यान विजय यांची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीत ते मुलासोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. तुमचा मुलगासुद्धा अभिनेता होणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, "त्याच्या डोक्यात काय आहे, याची मला काहीच कल्पना नाही. मी कधीच माझ्या मुलावर अभिनय क्षेत्रात येण्यासाठी बळजबरी केली नाही."

"मी असं कधीच करणार नाही. त्याच्या आवडीवर सगळं अवलंबून आहे. जर त्याला माझ्या पाठिंब्याची गरज असेल तर तो मी आवर्जून देईन. पण माझ्या मुलांना आपल्या आवडीचा मार्ग निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. अनेक दिग्दर्शकांनी मुलाच्या डेब्युसाठी विचारणा केली आहे. पण याचा अंतिम निर्णय हा जेसनचाच असेल", असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

चित्रपटांच्या ऑफर्सबद्दल मुलाची काय प्रतिक्रिया असते, असं विचारलं असता विजय यांनी उत्तर दिलं, "तो मला म्हणतो की, कृपया मला काही वर्षे डिस्टर्ब करू नका. मला सध्या तरी अभिनयाचे ऑफर्स स्वीकारायचे नाहीत. त्याला कॅमेरासमोर काम करायचं आहे की कॅमेऱ्याच्या मागे राहून.. याचा अंतिम निर्णय तोच घेईल. करिअरसाठी त्याने कुठलाही मार्ग निवडला तरी मी त्यात खुशच असेन."