
लातूर जिल्ह्यातील हळद-वाढवणा येथे विद्युत वाहिन्यांच्या घर्षणामुळे 6 एकरातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे.

ग्रामस्थांचे प्रयत्नही निष्फळ: नारायण चव्हाण यांचे शेत गावाला लागूनच आहे. शिवाय याच ठिकाणी घरही. ऊसाला आग लागताच ती विझवण्याचे ग्रामस्थांनी प्रयत्न केले पण ऊन आणि वाऱ्यामुळे ही आग पसरतच गेली. शिवाय ऊसाचे पाचरट हे वाळले असल्याने अवघ्या काही वेळातच सहा एकरातील ऊस आगीने कवेत घेतला.

नुकसान भरपाईची मागणी : वर्षभर परिश्रम आणि पाण्यासारखा पैसा खर्ची करुन पिकाची जोपासणा केली जाते. मात्र, अशा या कारभारामुळे क्षणार्धातच होत्याचे नव्हते होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसत असून या घटनेचा त्वरीत पंचनामा करुन आर्थिक मदत करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. विद्युत वाहिन्यांना पर्यायी मार्ग शोधावा अशी मागणीही त्यांनी वेळोवेळी केली होती. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

जीवीत हानी नाही: ऊसाच्या फडाला लागूनच चव्हाण यांचे घर असल्याने अधिकचा धोका होता. मात्र, दुपारच्या दरम्यान ही घटना झाल्याने लागलीच निदर्शनास आली. यामध्ये कोणतिही जीवीत हानी झालेली नाही. मात्र, ऊसाबरोबर इतर साहित्याचीही राख-रांगोळी झाली आहे.

कारखान्यानेही सहकार्य करावे : तोडणीला आलेल्या ऊसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे याचे त्वरीत गाळप झाले तरच उपयोग होणार आहे. त्यामुळे संबंधित साखर कारखान्याने ऊस घ्यावा आणि चव्हाण यांना मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.