राळेगणसिद्धीचा आदर्श देशभर गाजला; भारतीय लष्कराकडून विशेष सन्मान
अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी गावाला भारतीय लष्कराने एक अनोखी भेट दिली आहे. 1965 आणि 1971 च्या युद्धातील T-55 रणगाडा हा भेट देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी हे गाव ग्रामविकासाच्या आदर्श मॉडेलमुळे देशभरात ओळखले जाते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली या गावाने विकासाची नवी वाट चोखाळली आणि संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान बनले.

आता या गावाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ज्यामध्ये भारतीय लष्कराने राळेगणसिद्धीला एक अनोखी आणि ऐतिहासिक भेट दिली आहे. भारतीय लष्कराकडून 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये वापरण्यात आलेला ऐतिहासिक T-55 रणगाडा राळेगणसिद्धी गावाला भेट म्हणून प्रदान करण्यात आला आहे.

या रणगाड्याला ‘शौर्यसिद्धी’ असे नाव देण्यात आले असून तो देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक म्हणून गावात उभारण्यात येणार आहे. अण्णा हजारे यांच्या कार्यामुळे या गावाची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली.

त्यांच्या या योगदानाची दखल घेत भारतीय लष्कराने ही विशेष भेट दिली असल्याचे सांगितले जात आहे. या रणगाड्याचे अनावरण लवकरच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला ग्रामस्थ, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. रणगाड्याच्या स्थापनेमुळे राळेगणसिद्धीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराच्या शौर्याचा परिचय होणार आहे.