
सध्या तूर पीक फुलोऱ्यावर असून, मागील काही आठवड्यांपासून असलेल्या ढगाळ वातावरणासह रात्रीच्या थंड हवामानामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाची नियमित पाहणी करून वेळीच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश कानवडे यांनी केले आहे.

तूर पिकावर प्रामुख्याने हेलीकोवर्पा, पिसारी पतंग आणि शेंग माशी या किडी आढळतात. हेलीकोवर्पा किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालते. अळ्या कळ्या व फुले खाऊन नुकसान करतात, तर मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे पोखरतात. पिसारी पतंगाची अळी शेंगावरील साल खरडून बाहेरूनच दाणे पोखरते.

शेंग माशीची अळी शेंगाच्या आत राहून दाणे अर्धवट कुरतडते, त्यामुळे दाण्याची मुकणी होते. या तिन्ही किडींसाठी जवळपास सारखेच उपाय प्रभावी ठरतात. प्रति हेक्टर 20 पक्षीथांबे उभारावेत तसेच घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत.

पीक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना निंबोली अर्क, अझाडिरेक्टीन, एचएनपीव्ही, बॉसिलस थुरिनजिएसिस किंवा क्विनॉलफॉस यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची पहिली फवारणी करावी. त्यामुळे अळींची झापाट्याने वाढ होणार नाही आणि त्यांची संख्या वाढणार नाही. त्यामुळे पीकाचे नुकसान होणार नाही.

पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट, लॅम्ब्डा सायहॅलोथ्रिन, ईथिऑन किंवा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची दुसरी फवारणी करावी. वेळीच योग्य उपाययोजना केल्यास तूर पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण असल्याने या आळीचा जोर वाढला आहे. तूर पिकावर ही अळी झपाट्याने वाढत आहे. शेंग माशीची अळी शेंगाच्या आत राहून दाणे अर्धवट कुरतडते. त्यामुळे पीकाचे मोठे नुकसान होते. अशावेळी शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.