
मानव-वन्यजीव संघर्षावर वनविभागाने तोडगा काढला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असल्याने सध्या ग्रामीण जनतेत पदोपदी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बिबट्याने मोठा उच्छाद केला आहे. लहान मुलांचा त्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर इकडे चंद्रपूरमध्ये वाघाची मोठी दहशत आहे. गावकरी शेतात जायला भीत आहेत. तर गुराख्यांच्या मनात भीती आहे.

वाघांच्या वाढत्या हल्ल्यांना बेजार झालेल्या गुराख्यांनी त्यांच्या रक्षणार्थ वनविभागाने तोडगा काढला असून, त्रिशूल व इतर साहित्य देऊन स्वरक्षण करण्याचे आत्मबल निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

त्यामुळे गुराख्यांना फार मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा गावात सुरू आहे. आत्मरक्षणाचे असेच उपक्रम इतरही गावात राबविण्यात येणे गरजेचे आहे. हे त्रिशूल घेऊन गुराखी आता एकीने शेतात गुरं चारण्यासाठी जात आहेत.

या गुरख्यांनी अजून एक शक्कल लढवली आहे. प्लास्टिकचा मानवी तोंड असलेला मास्क हे गुराखी डोक्याला पाठीमागून लावत आहेत. त्यामुळे मनुष्य आपल्याकडे पाहत असल्याचे वाघाला भासवले जाते. तर या भागात साऊंड सिस्टिमही लावण्यात येऊन वाघांना पळवण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत आहे.

मानव वन्यजीव संघर्ष ही ग्रामीण भागात नित्यनियमाचीच बाब ठरत असून, यावर तोडगा काढण्यासाठी वनविभाग अनेक उपाययोजना राबवीत आहे. त्यात आता त्रिशूल आणी प्लास्टिक मास्कची भर पडली आहे.