भारतीय सिनेमांमध्ये या अभिनेत्रीने दिलेला पहिला बिकिनी सीन, 88 वर्षांपूर्वीचा चित्रपट पुन्हा चर्चेत
88 वर्षांपूर्वी या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्रीने दिला होता पहिला बिकिनी लूक. सुपरस्टार महेश बाबू यांच्यासोबत आहे खास कनेक्शन. कोण आहे ती अभिनेत्री?

आजच्या काळात चित्रपट किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेत्रींचा बोल्ड लूक आणि स्विमसूटमधील भूमिका सामान्य बाब मानली जाते. मात्र, भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वप्रथम स्विमसूट परिधान करून पडद्यावर झळकणारी अभिनेत्री कोण होती, याची माहिती अनेकांना नसते.

अनेकजण याचे श्रेय शर्मिला टागोर यांना देतात, परंतु प्रत्यक्षात हा मान अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांना जातो. 1938 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्रह्मचारी या मराठी चित्रपटात मीनाक्षी शिरोडकर यांनी स्विमसूट परिधान करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते.

त्या काळात देशात ब्रिटिश राजवट होती आणि समाज अत्यंत पारंपरिक विचारसरणीचा होता. अशा परिस्थितीत चित्रपटातील एका गाण्यात मीनाक्षी शिरोडकर स्विमसूट घालून पाण्यातून बाहेर येताना दिसल्या. हा प्रसंग त्या काळातील प्रेक्षकांसाठी अत्यंत धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरला.

या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेते व दिग्दर्शक मास्टर विनायक प्रमुख भूमिकेत होते. ब्रह्मचर्य संकल्पनेवर विनोदी भाष्य करणारा हा चित्रपट मोठा हिट ठरला आणि मीनाक्षी शिरोडकर रातोरात लोकप्रिय झाल्या.

विशेष म्हणजे मीनाक्षी शिरोडकर यांचा संबंध आजच्या चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांशी जोडला जातो. त्या अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आणि माजी मिस इंडिया नम्रता शिरोडकर यांच्या आजी होत्या. नम्रता शिरोडकर यांनी दक्षिण भारतीय सुपरस्टार महेश बाबू यांच्याशी विवाह केला असल्याने मीनाक्षी शिरोडकर या महेश बाबू यांच्या आजी-सासू ठरतात.