ही रोमँटिक थ्रिलर सीरिज टॉप ट्रेंडिंगमध्ये; 12 हजार कोटी कमावलेल्या सिनेमालाही टाकलं मागे
जियो हॉटस्टारवर प्रदर्शित झालेली ही रोमँटिक थ्रिलर वेब सीरिज सलग आठ दिवसांपासून टॉप 3 मध्ये ट्रेंड करत आहे. सीरिजचा हा दुसरा सिझन असून प्रेक्षकांकडून त्याला दमदार प्रतिसाद मिळतोय.

जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 19 जून 2026 रोजी 'ठुकरा के मेरा प्यार' या वेब सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून ही सीरिज टॉप 3 मध्ये ट्रेंड होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज आधीपासूनच जम बसवलेल्या मोठमोठ्या चित्रपट आणि सीरिजना टक्कर देत आहे. ताज्या ट्रेंड्सनुसार, जियो हॉटस्टारवर सध्या टॉप 3 मध्ये अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट पहायला मिळत आहेत.

पहिल्या क्रमांकावर 'लाफ्टर शेफ' असून दुसऱ्या क्रमाकांवर 'ठुकरा के मेरा प्यार'चा दुसरा सिझन आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर 'अवतार : फायर अँड अॅश' ट्रेंड होत आहे. प्रदर्शनाच्या आठ दिवसांतच टॉप 3 मध्ये पोहोचणं ही 'ठुकरा के मेरा प्यार 2' साठी अत्यंत चांगली बाब मानली जात आहे. कारण या सीरिजने बॉक्स ऑफिसवर तब्बल 12 हजार कोटी रुपये कमावलेल्या 'अवतार'लाही मागे टाकलं आहे.

'ठुकरा के मेरा प्यार 2'मध्ये शानविका चौहान आणि कुलदीप कुमार यांच्या कथेला पुढे नेण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्या नात्यात प्रेम, विश्वासघात, पश्चात्ताप आणि सूडाची आग या सर्व गोष्टी पहायला मिळत आहेत. सीरिजची ही नवीन कथा वैयक्तिक शत्रुत्वावरून राजकीय संघर्षाकडे वळली आहे.

या सीरिजमध्ये धवल ठाकूर, संचिता बसू, अनिरुद्ध दवे, सुशील पांडे, गोविंद पांडे आणि पलक जैन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजला आयएमडीबीवर दहापैकी 7.8 रेटिंग मिळाली आहे. या सीरिजमध्ये कुलदीपची कथा दाखवण्यात आली आहे, जो एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा असून तो अत्यंत प्रभावशाली चौहान कुटुंबातील शानविकाच्या प्रेमात पडतो.

जेव्हा कुलदीप शानविकाला लग्नाची मागणी घालतो, तेव्हा ती सुरुवातीला होकार देते. या दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत चाललेलं असतं. मात्र नंतर ती तिच्या कुटुंबाची बाजू घेते आणि कुलदीपच तिच्या मागे लागला आहे, असं खोटं बोलते. इथूनच प्रेम, न्याय आणि सूडाची कहाणी सुरू होते.