Baking Soda Hacks : कपडे होतील चकाचक, बाथरूमही चमकेल ! किचनमधल्या या जादुई पदार्थाने, टेन्शन मिटेल
तुमच्या कपड्यांवर डाग पडलेले असतील किंवा बाथरूम अस्वस्छ असेल, तर किचनमधल्या फक्त एका पदार्थाने दोन्ही काम सहज निपटू शकतात. चला जाणून घेऊया सोपी ट्रिक

बेकिंग सोडा हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात किंवा किचनमध्ये असतोच. त्यालाच स्वीट सोडा किंवा बेकिंग सोडा असेही म्हणतात. याचा उपयोग विविध खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. राजमा आणि चणे लवकर उकडण्य़ासाठी, नीट शिजण्यासाठी तो वापरला जातो. जी कामं करायला तासतास वेळ खर्च करावा लागू शकतो, बेकिंग सोडाच्या मदतीने ती कामं झटक्यात होऊ शकतात.

बेकिंग सोडा, ज्याला सोडियम बायकार्बोनेट असेही म्हणतात, याचा उपयोग सामान्यतः केक आणि ब्रेडसारखे भाजलेले पदार्थ फुगवण्यासाठी केला जातो. दही आणि लिंबू यांसारख्या घटकांमध्ये मिसळल्यावर, तो वायूचे बुडबुडे तयार करतो, ज्यामुळे भाजलेले पदार्थ फुगतात आणि बाहेरून मऊ व कुरकुरीत राहतात. बेकिंग सोडाच्या अल्कधर्मी गुणधर्मांमुळे तो अनेक कामांसाठी उपयुक्त ठरतो. चला, किचन सोडून त्याचे उपयोग जाणून घेऊया.

बेकिंग सोडा दात करेल उजळ : दातांवरील डाग आणि पिवळेपणा लाजिरवाणा ठरू शकतो. लोक ते स्वच्छ करण्यासाठी महागड्या टूथपेस्टसुद्धा विकत घेतात. पण बेकिंग सोडा दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळून त्याची घट्ट पेस्ट बनवा, नंतर ती तुमच्या टूथब्रशवर किंवा बोटावर लावा आणि दात घासा. लक्षात ठेवा की याचा वापर आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदाच करावा, नाहीतर यामुळे दातांवरील आवरण (एनॅमल) झिजून दात संवेदनशील होऊ शकतात. अतीवापर टाळा.

तोंडाची दुर्गंधी होईल दूर: बेकिंग सोडा हा एक उत्कृष्ट क्लिनझर आहे आणि जीवाणूं रोखण्यास मदत करतो. यामुळे केवळ तोंडाची दुर्गंधीच कमी होत नाही, तर आपला ब्रश जिथे सहज पोहोचू शकत नाही अशा ठिकाणची घाणही यामुळे स्वच्छ होते. याचा माउथवॉश म्हणून वापर करता येऊ शकतो. त्यासाठी अर्धा चमचा बेकिंग सोडा कोमट पाण्यात विरघळवून त्याने गुळण्या करा. यामुळे तुमच्या श्वासाला ताजेपणा येईल.

कपडे होतील चमकदार: बेकिंग सोडा कपड्यांवरील डाग काढण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी, डिटर्जंटमध्ये 2-3 मोठे चमचे बेकिंग सोडा घालून कपडे धुवा. यामुळे तुमचे कपडे अधिक चमकदार दिसतील. कारण बेकिंग सोडा हे एक क्षार आहे. त्यामुळे घाण सहजपणे निघून जाते. जर तुमच्या कपड्यांवर न निघणारा डाग असेल, तर बेकिंग सोडा आणि लिंबाची पेस्ट बनवून ती डागावर काही मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर साबणाने स्वच्छ करा. कपडे स्वच्छ होतील आणि चमकू लागतील.

बाथरूमही होईल स्वच्छ : जर तुम्हाला तुमच्या बाथरूममध्ये, टाइल्सवर, परशीवर असलेली घाण, साबणाचे डाग आणि खारट पाण्याच्या खुणा साफ करण्यात अडचण येत असेल, तर बेकिंग सोडा वापरून पहा. यामुळे तुमची बरीच मेहनत आणि एनर्जी , दोन्ही वाचू शकतं. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करून एक मिश्रण तयार करा. त्यात थोडं कोमट पाणी घाला आणि ते डाग पडलेले भाग, फरशीवर भागांवर लावा. ते किमान 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या.

चांदीची भांडी चमकवा: तुमच्या घरात चांदीची भांडी किंवा दागिने असल्यास, ती स्वच्छ करण्यासाठी देखील तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. काही वापरानंतर चांदीच्या भांड्यांवर डाग पडू लागतात, त्यामुळे त्यांना पॉलिश करण्याची किंवा स्वच्छ करण्याची गरज भासते. अशा वेळी झटपट उपाय हवा असेल तर कोमट पाण्यात बेकिंग सोडा मिसळा. चांदीची भांडी या द्रावणात काही मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर, स्पंज किंवा मऊ ब्रशने ती स्वच्छ करा. ती नव्या सारखी चमकू लागतील. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)