‘देऊळ बंद 2’नंतर ‘तुंबाडची मंजुळा’ ठरतोय ब्लॉकबस्टर; दोन आठवड्यात तब्बल इतकी कमाई
सध्या मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण एकामागोमाग एक असे दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि बॉक्स ऑफिसवर त्यांची कमाईसुद्धा उत्तम होत आहे. असाच एक हा चित्रपट म्हणजे 'तुंबाडची मंजुळा'.

ती आली, तिने पाहिलं आणि तिने सारं काही जिंकून घेतलं... हे वर्णन जिच्यासाठी चपखल लागू होईल ती कलाकृती म्हणजे 'तुंबाडची मंजुळा'. विविध कोरगांवकर यांचं दिग्दर्शन सोबतीला एकाहून एक मातब्बर कलाकारांची फौज, उत्कंठावर्धक आणि तेवढंच मजेशीर कथानक, कर्णमधुर संगीत, निसर्गसंपन्न कोकणाचं दर्शन, आणि संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट.

या चित्रपटाने केवळ दोनच आठवड्यांत कमाईचा 15 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. मुंबई पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रभर झळकणारे हाऊसफुलचे बोर्ड, समीक्षकांकडून मिळालेली पसंतीची पावती, प्रेक्षकांकडून येणाऱ्या कौतुकाच्या प्रतिक्रिया, सोशल मीडियावर सामान्य प्रेक्षकापासून ते इन्फ्लुएन्सर्समध्ये निर्माण झालेली क्रेझ यातूनच चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशाची प्रचिती येत आहे.

चित्रपटाला सर्वत्र मिळणारा तुफान प्रतिसाद बघता प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम सध्या विविध शहरांत चित्रपटगृहांना भेटी देत आहेत. यावेळी "हा चित्रपट आम्हाला खूप भावलाय", "आम्ही खूप दिवसांनी खळखळून हसलो", "संपूर्ण कुटुंबासह आनंद घेण्यासारखा चित्रपट आहे", "चांगला सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे" अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.

विशेष म्हणजे हा चित्रपट पुन्हा पुन्हा बघायला येणारेही अनेक प्रेक्षक होते. "एकदा बघून मन भरत नाही म्हणून पुन्हा एकदा बघायला आलो" अशा भावना ते व्यक्त करत आहेत. तुंबाडची मंजुळा चित्रपटाचं यश हे केवळ कमाईच्या आकड्यांवरती मोजण्यासारखं नाहीये कारण या चित्रपटाचा परीणाम हा त्याहीपुढचा आहे. यानिमित्ताने समाजातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा चर्चेस आला आहे हे विशेष.

या चित्रपटात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अंशुमन विचारे, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी यांच्या मुख्य भूमिका असून सहकलाकारांमध्ये योगेश शिरसाट, शार्दुल सराफ, उमेश जगताप, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, अथर्व रुके, प्रियल नाईक, वर्षा दांदळे यांचा समावेश आहे.