Santosh Pandit : संतोष पंडित यांचा सत्कार केल्यानंतर रविंद्र धंगेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, एखाद्या गुंडाप्रमाणे…
संतोष पंडित यांचा सत्कार केल्यानंतर रविंद्र धंगेकरांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी संतोष पंडित यांच्या कार्याचं समर्थन केलं.

पुण्यातील युट्युबर संतोष पंडित यांना 3 सप्टेंबर रोजी अटक झाली होती. काही दिवसांपूर्वी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर संतोष पंडित यांनी पुन्हा एकदा सामाजिक कार्य करणार असल्याचे स्पष्ट केलंय. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना जीभ घसरल्याने संतोष पंडित यांना जेलची हवा खावी लागली. परंतु आता या प्रकरणात संतोष पंडित यांना जामीन मिळालाय. जामीन मिळाल्यानंतर माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी संतोष पंडित यांचा सत्कार केला. या सत्कारानंतर रवींद्र धंगेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना नेते रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘संतोष पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती. संतोष पंडित यांना माझे समर्थन आहे. पोलीस नेमकं कुणासाठी काम करत आहेत? कलियुगाची सुरुवात आता कोथरूडपासून झाली आहे. दादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून धरून केले जात आहेत. हिटलरशाही आणि हुकूमशाही फारकाळ टिकणार नाही. एखाद्या गुंडाप्रमाणे संतोष पंडित यांना रात्री अटक केली. पुणे पोलिसांची भूमिका पारदर्शक नाही’.
धंगेकरांकडून संतोष पंडित यांचा सत्कार
पुण्यात शिंदे गटाचे नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी युट्युबर संतोष पंडित यांचा सत्कार केला. धंगेकरांनी पुण्यातील त्यांच्या कार्यालयात बोलावून पंडित यांचा सत्कार केला. संतोष पंडित यांनी भाजप नेत्यावर टीका करताना असंसदीय भाषेचा वापर केल्यानंतर त्यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात जामीन झाल्यावर रवींद्र धंगेकर यांनी संतोष पंडित यांचं समर्थन केलं आहे. त्यानतंर जामीन मंजूर होताच धंगेकरांनी संतोष पंडित यांचा सत्कार केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तत्पूर्वी, संतोष पंडित यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. एका महिलेने संतोष पंडित यांच्या विरोधात तक्रार दिली होती. व्हिडिओ पाहिल्यानंतर मनास लज्जा उत्पन्न झाल्याचे सांगून महिलेने पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर संतोष पंडित यांना अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं.
