Dhanteras 2026: आज धनत्रयोदशी निमित्ताने सोने-चांदी खरेदी करणार आहात? जाणून घ्या खरेदीचा शुभ मुहूर्त
यंदा धनत्रयोदशी आज, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी साजरी केली जात आहे. या निमित्ताने, सोने-चांदी खरेदी केली जाते पण त्यासाठी एक खास मुहूर्त असतो. या मुहूर्ताची नेमकी वेळ जाणून घ्या.

आज, नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीचा सण देशभरात साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. आज सकाळपासूनच बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची मोठी वर्दळ दिसून येत आहे. त्यातील महत्त्वाचं म्हणजे सोनं-चांदीची खरेदी. दर गगनाला भिडले असले तरी काही लोक सोने-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, आजच्या या शुभ दिनी नेमका कधी सोनं-चांदी खरेदी केलं पाहिजे? यासाठी एक खास मुहूर्त असतो. चला आजच्या या खास मुहूर्ताबद्दल जाणून घेऊयात.
1. यंदा धनत्रयोदशी कधी साजरी केली जाणार?
धनत्रयोदशीचा सण आज शुक्रवारी, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी साजरा केला जात आहे. हा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीलाच येतो.
2. धनत्रयोदशीला पूजेसाठीचा शुभ मुहूर्त कोणता?
धनत्रयोदशीच्या पूजेसाठी संध्याकाळी ६:०१ ते रात्री ७:५८ पर्यंतचा वेळ शुभ मानला आहे. या काळात भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा तुम्ही करू शकता.
3. धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करण्यासाठी नेमका शुभ मुहूर्त कोणता?
धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी ९:१६ ते १०:३९ पर्यंत ‘अमृत चौघडिया’ आणि दुपारी १२:०१ ते १:२४ पर्यंत ‘शुभ चौघडिया’ आहे. तसेच, दुपारी ४:०९ ते संध्याकाळी ५:३१ पर्यंत ‘चर चौघडिया’ आणि रात्री ८:४६ ते १०:२४ पर्यंत ‘लाभ चौघडिया’ आहे. या कालावधीत खरेदी करणे शुभ मानले जाते.
4. धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करायचं?
धनत्रयोदशीचा दिवस हा शुभ मनाला जातो. या दिवशी सोने-चांदीसोबतच तुम्ही पितळ आणि तांब्याची भांडी, झाडू, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अख्खे धणे आणि ‘गोमती चक्र’ खरेदी करणे शुभ मानले जाते.
5. धनत्रयोदशीच्या दिवशी काय खरेदी करणे टाळावे?
पारंपारिक समजुतींनुसार, या दिवशी लोखंडी वस्तू, काळ्या रंगाच्या वस्तू, सुऱ्या, कात्री आणि प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणे टाळावे, असा सल्ला दिला जातो. मात्र, या केवळ धार्मिक समजुती आहेत, अनिवार्य नियम नाहीत.
