‘पार्थ सावध हो’, सोमेश्वर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय अजितदादांना लिहिलेलं भावनिक पत्र व्हायरल
Ajit Pawar : कारखान्याच्या सभासदांना गेल्या दोन महिन्यांत मिळालेल्या दोन वेगवेगळ्या अहवालांमध्ये विविध नेत्यांचे फोटो आणि काही पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. मात्र अजित पवार कुटुंबातील लोकप्रतिनिधींच्या नामोल्लेखाचा अभाव असल्याचा दावा पत्रातून करण्यात आलाय.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय अजितदादांना उद्देशून लिहिलेलं एक भावनिक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या पत्रात सोमेश्वर कारखाना आणि अजित पवार कुटुंबामधील राजकीय संबंधांचा उल्लेख करण्यात आला आहे. सध्याच्या घडामोडींवर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पत्रात सोमेश्वर कारखान्याचा उल्लेख अजितदादांनी प्रेमाने जपलेल्या आणि वाढवलेल्या वृक्षाशी करण्यात आला आहे. तसचं, कारखान्याच्या सभासदांना गेल्या दोन महिन्यांत मिळालेल्या दोन वेगवेगळ्या अहवालांमध्ये विविध नेत्यांचे फोटो आणि काही पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. मात्र अजित पवार कुटुंबातील लोकप्रतिनिधींच्या नामोल्लेखाचा अभाव असल्याचा दावा पत्रातून करण्यात आला आहे.
याच मुद्द्यावरून “तुमच्याच आशीर्वादाने मोठे झालेले काही लोक आता तुमच्याच कुटुंबाला बाजूला करण्याच्या राजकारणात आहेत का?” असा सवाल पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीतील घडामोडींचा संदर्भ देत, पक्षांतर्गत विरोधाबाबतही पत्रात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र हे दावे पत्रलेखकाच्या भूमिकेचा भाग असून त्याबाबत स्वतंत्र अधिकृत पुष्टी दिलेली नाही.
‘आशीर्वाद असू द्या दादा’
दरम्यान, सोमेश्वर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, “पार्थ सावध हो” आणि “दादा, लक्ष ठेवा सोमेश्वरवर आणि कुटुंबावर” या भावनिक आवाहनांची विशेष चर्चा होत आहे. पत्राच्या शेवटी “आशीर्वाद असू द्या दादा” म्हणत स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं आहे.
पवार विरुद्ध पवार
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पॅनेलविरोधात युगेंद्र पवार स्वतंत्र पॅनल उभं करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दोन वेगवेगळे गट आमने-सामने येणार
सुनेत्रा पवार यांनी भावकी, गावकीचे गट-तट बाजूला ठेवून एकजुटीने पुढे जाण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आता युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनलची घोषणा केल्याने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत दोन वेगवेगळे गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
