वरळीचा कट्टा, सी लिंक अन्.., समर देणार स्वानंदीला प्रेमाची कबुली, ‘वीण दोघांतली..’ मध्ये रोमँटिक ट्विस्ट
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत आतापर्यंतचा सर्वांत मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यात समर स्वानंदीला अत्यंत ग्रँड पद्धतीने प्रपोज करताना दिसत आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत आतापर्यंतचा सर्वांत मोठा ट्विस्ट आला आहे. या मालिकेतील समर आणि स्वानंदीची जोडी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आता या दोघांच्या आयुष्यात एक रोमँटिक टप्पा येणार आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते.

या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. कारण मालिकेतील ज्या टप्प्याची प्रेक्षक प्रचंड आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे. समर स्वानंदीला प्रेमाची जाहीर कबुली देणार आहे.

समर राजवाडे प्रपोज करणार म्हटल्यावर सर्वाकाही ग्रँडच असेल. वर्तमानपत्रात स्वानंदीचे फोटो छापले आहेत, 'स्वानंदी आज भेटुयात 7.30 वाजत वरळीत' असे लिहिलेले होर्डिंग्स रस्त्यावर लावले आहेत. कोणत्याही मुलीला स्वप्नवत वाटावं, असं हे प्रपोजल असणार आहे.

वरळी सीलिंकवर 'आय लव्ह यू स्वानंदी' अशी रोषणाई आणि तिचा फोटो पाहताच स्वानंदी खूप खुश होते. 'तडजोडीचं नातं इतकं सुंदर होईल असा कधीच विचार केला नव्हता', असं म्हणत समर स्वानंदीला गुलाबाचं फूल देतो. त्यानंतर दोघं एकमेकांना मिठी मारतात.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतील हा ट्विस्ट आणि प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'आता खऱ्या अर्थाने सीरिअल सुरू झाली', असं एकाने लिहिलं. तर 'जून महिन्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, शेवटी स्वानंदीच्या मनासारखं झालं', असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

'वरळी ब्रीजचा इतका पुरेपूर रोमँटिक उपयोग खरंच कोणी केला नसेल, प्रोमो इतका छान असेल तर एपिसोड तर एकदम पैसा वसू असणार. इतके दिवस वाट पाहिल्याचं शेवटी कदाचित चीज होणार', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान ही स्वानंदी आणि सुबोध भावे समरची भूमिका साकारत आहे. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तडजोडीतून स्वानंदी आणि समर एकमेकांशी लग्न करतात, पण अखेर आता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडताना दिसत आहेत.