
विदर्भाची ओळख असलेल्या संत्रा आणि मोसंबी पिकावर अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने मोठे संकट कोसळले आहे. सततच्या खराब हवामानामुळे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांत या फळपिकांचे अंदाजे २०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

या बागांमधील ८० ते ९० टक्के फळं गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विदर्भात साधारण सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर संत्री आणि मोसंबीची लागवड होते.

परंतु, सध्या बागांमध्ये पाहिल्यास सर्वत्र गळालेल्या फळांचा सडा दिसत आहे. प्रचंड फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी ६ ते ७ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

पीक हातातून गेल्यामुळे संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे ते पूर्णपणे हवालदील झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात या नुकसानीची दाहकता अधिक स्पष्टपणे दिसून येते.

जेलवाडी येथील शेतकरी दयाराम जुगसेनीया यांची तीन एकर मोसंबी बाग आहे. यंदा या बागेसाठी त्यांनी तीन ते चार लाख रुपये खर्च केला होता आणि त्यांना सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते.

मात्र, आता बागेत सर्वत्र फळ गळाल्याने त्यांचे हे उत्पन्न एक-दोन लाख रुपयेही होणार नाही. त्यांच्या बागेतील ८० ते ९० टक्के फळं जमिनीवर पडलेली पाहून शेतकऱ्यांच्या यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कमाई एका झटक्यात मातीमोल झाली आहे. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी शासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या या अभूतपूर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना तातडीने आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.