
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्का येथे बैठक होणार आहे. या बैठकीत युक्रेन आणि रशियातील युद्धावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या बैठकीत युद्धाबाबत सकारात्मक चर्चा झाली नाही तर रशियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे.

त्यामुळेच आता या बैठकीत काय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या बैठकीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना पुतिन यांनी मोठा डाव टाकला आहे. त्यांच्या या खेळीमुळे अमेरिका खूश होण्याची शक्यता आहे. तसेच या एका डावपेचामुळे भारतही मालामाल होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याआधी पुतिन यांनी या बैठकीवर भाष्य केलंय. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची वाहवा केली आहे. ट्रम्प रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्याबाबत गंभीर आहेत. हे युद्ध थांबावे यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, असे गौरवोद्गार पुतिन यांनी काढले आहेत.

तसेच त्यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीवर शांततेबाबत तोडगा निघेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. पुतिन यांनी ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता या बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यावर तोडगा निघण्याची आशा वाढल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अमेरिकेने भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून भारताच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क वाढवलेले आहे. तसेच रशिया-युक्रेनच्या मुद्द्यावरूनही ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता. असे असताना पुतिन यांच्या भूमिकेमुळे युद्धावर तोडगा निघालाच तर अमेरिका भारतावर लादलेल्या टॅरिफबाबत पुनर्विचार करू शकते.

रशिया-युक्रेनमधील युद्ध थांबले तर अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे जर खरे ठरले तर पुतिन-ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारताला होणारे आर्थिक नुकसान थांबू शकते आणि यात भारताचाही फायदा होऊ शकतो. मालामाल होण्याचा दरवाजा भारतासाठी पुन्हा एकदा खुला होऊ शकतो. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.