
खरीप हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या कपाशीची वेचणी सुरु झाली आहे. आता रब्बी हंगामासह दिवाळीसाठी शेतकरी कपाशी विकण्याची तयारी करीत आहेत.

परंतु वाशिम जिल्ह्यात अद्याप शासकीय खरेदी सुरु झालेली नाही. तर खासगी केंद्रांनाही मुहूर्त मिळाला नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

जिल्ह्यात यंदा 21 हजार 367 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. प्रामुख्याने मानोरा, कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात कपाशीचे क्षेत्र अधिक आहे. यंदा परतीच्या पावसाने कपाशीचे मोठे नुकसान केले.

कापसाच्या उत्पादनात घट झाली असली तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.

व्यापाऱ्यांना अद्याप मुहूर्त सापडला नाही. तर शासकीय केंद्राबाबत शासनस्तरावर कोणताच निर्णय झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेचणी केलेला कापूस घरातच साठविला जात आहे.