
आजपर्यंत आपण सोनं चांदी, मोबाईल, पैसे चोरल्याच्या अनेक घटना, बातम्या ऐकल्या असतील. पण बीडच्या साक्षाळ पिंपरी येथील त्रिंबक काशीद नामक शेतकऱ्याच्या विहिरीमधील चक्क सहा टँकर पाणी चोरीला गेलं आहे.

बीडमधील भीषण दुष्काळ आणि पाण्याची टंचाई खूप आहे. त्यामुळे त्रिंबक चंद्रभान काशिद, या शेतकऱ्याने गेल्या दोन महिन्यांपूर्वी आपल्या शेतातील सहा सरस असलेल्या विहिरीमध्ये अडीच परस पाणी साठवून ठेवलं होतं.

हे पाणी त्यांच्या गुराढोरांसाठी त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये वीस गुंठ्यामध्ये आंब्याच्या लावलेल्या झाडांसाठी साठवलेलं होतं.

काही अज्ञात चोरट्यांनी शेतातील विद्युत पेटीचे लॅाक तोडुन अन मोटर चालु करुन बांधावरील मुख्य हुसासा मधुन विहिरीतील पाणी चोरले व विहीर पूर्ण खाली केली.

धक्कादायक बाब म्हणजे, ते चोर एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी काही पुरावा पाठीमागे राहू नये म्हणून उर्वरीत पाणी शेतात वाया घालवले.

ज्यांच्या शेतात पाण्याची चोरी झाली ते शेतकरी दोन दिवस आपल्या नातेवाईकांकडे लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. याचाच फायदा घेऊन हा प्रकार अज्ञात लोकांनी केल्याचा आरोप त्यांनी केला.

समोरुन कोणी मागीतले असते तर त्याला निःशुल्क पाणी दिले असते , चोरायची गरज काय असा सवाल विचारणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात संताप होता.

आता जनावरांना आणि झाडांना पाणी कुठून देऊ,आंब्याची झाडं आम्ही जगवायची कशी असा प्रश्न विचारताना शेतकरी महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले.