
जगात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका असतो, पण भारतात एक ठिकाण असे आहे जिथे तापमान इतके खाली जाते की श्वास घेणेही कठीण होते. हे ठिकाण म्हणजे द्रास (Drass), जे लडाखचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. द्रास हे भारतातील सर्वाधिक थंड वस्ती असलेले गाव म्हणून ओळखले जाते.

द्रासमध्ये राहणे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असून इथले लोक निसर्गाच्या कठोर परिस्थितीला धैर्याने तोंड देत जगतात. द्रास हे ठिकाण 'झोजी ला पास' (Zoji La Pass) आणि कारगिल शहराच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग १ वर आहे. लेहला जाणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.

द्रासमध्ये सुमारे २२,००० लोक राहतात, त्यापैकी बहुतेक शिना भाषिक दार्दिक समुदायाचे आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी येथील घरे मोठ्या दगडी भिंती आणि लाकडापासून बनवलेली असतात.

या ठिकाणी राहणारे लोक लोकरीचे आणि फरचे जाड पारंपरिक कपडे वापरतात. येथील जीवन प्रामुख्याने शेती, पशुपालन आणि पर्यटन यावर अवलंबून असते. उन्हाळ्यात येथे बार्ली, बटाटे आणि वाटाणे पिकवले जातात.

द्रास व्हॅली केवळ थंडीसाठीच नाही, तर आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांततेसाठी ओळखली जाते. बर्फाच्छादित पर्वत, अल्पाइन कुरणे आणि हिमनदी नद्यांचे सुंदर दृश्य द्रास व्हॅलीत पाहायला मिळते.

ट्रेकिंग आणि साहसप्रेमी प्रवासी अमरनाथ, सुरु व्हॅली आणि मुस्कोह व्हॅली (Muskoh Valley) सारख्या मोहिमांसाठी द्रासचा बेस कॅम्प म्हणून वापर करतात. कारगिल युद्धक्षेत्राच्या जवळ असल्याने या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे.

द्रासला पोहोचणे हे एक आव्हान आहे. सर्वात जवळचे विमानतळ सुमारे १५० किलोमीटर अंतरावर लेह येथे आहे. रस्त्याने प्रवास करण्यासाठी धोकादायक 'झोजी ला पास' ओलांडावा लागतो. हा मार्ग हिवाळ्यात जोरदार बर्फवृष्टीमुळे अनेकदा बंद असतो.

सायबेरियातील ओयम्याकोन (Oymyakon) नंतर द्रास हे जगातील दुसरे सर्वात थंड वस्ती असलेले ठिकाण मानले जाते. या ठिकाणी हिवाळ्यात सरासरी तापमान -२०°C ते -२५°C तापमान असते. जानेवारी १९९५ मध्ये ओयम्याकोन या ठिकाणी किमान तापमान -६०°C नोंदवले गेले होते. येथील लोकांना कडाक्याची थंडी, मुसळधार बर्फवृष्टी आणि जोरदार वाऱ्यांचा सामना करावा लागतो.